भेसळ माफियांवर तुकाराम मुंढे यांचा सर्जिकल स्ट्राईक , राज्यभरात टाकल्या तब्बल २०३ ठिकाणी धाडी...

Foto

मुंबई : डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. ग्राहकांना शुद्ध अन्न आणि शेतकर्‍यांना दुधाचा योग्य दर मिळालाच पाहिजे, नियम मोडणार्‍यांची गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दांत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ माफियांना थेट चेतावणी दिली आहे. राज्यातून भेसळ हद्दपार करण्यासाठी आता विभागाने कंबर कसली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा थेट इशारा देत मुंढे यांनी सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या अवघ्या ६ दिवसांत विभागाने राज्यभरात तब्बल २०३ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

या धडक मोहिमेत सुमारे १ कोटी ५८ लाख २८ हजार रुपयांचा भेसळयुक्त आणि प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १०२ जणांना अटक करण्यात आली असून, ६८ आस्थापने तात्काळ सील करण्यात आली आहेत. तुकाराम मुंढे यांच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे भेसळ करणार्‍या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

दूध उत्पादक संघटनांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
याच पार्श्वभूमीवर, दूध उत्पादक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. या बैठकीत चितळे डेअरीचे ज्येष्ठ संचालक श्रीपाद चितळे, आबासाहेब थोरात आणि प्रकाश कुतवळ यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्याबाबत सविस्तर चर्चा केली. चांगल्या दर्जाचे दूध उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचे योग्य मूल्य मिळालेच पाहिजे, यासाठी एफडीए कटिबद्ध असल्याचे मुंढे यांनी या वेळी स्पष्ट केले.

बनावट पनीरवर हातोडा, प्रयोगशाळा होणार हायटेक
विभागाच्या प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण केले जात असून, यामुळे गुणवत्ता तपासणी अधिक जलद गतीने होईल, असे मुंढे यांनी सांगितले. दरम्यान, एफडीएने बनावट पनीर बनवणार्‍यांवर केलेल्या कारवाईचे मोठे सकारात्मक परिणाम बाजारात दिसू लागले आहेत. बनावट पनीर हद्दपार झाल्याने आता खर्‍या दुधापासून बनवलेल्या पनीरला मागणी वाढली आहे. अनेक हॉटेल्समध्ये आता आमच्याकडे शुद्ध दुधाच्या पनीरच्या भाज्या मिळतात असे फलक झळकू लागल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली.